पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल १६ हजार ८३८ पदांसाठी मेगाभरती, सविस्तर माहिती जाणून घ्या
PCMC Bharti 2023: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मेगाभरती केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा होणारा विस्तार आणि त्यामुळे वाढलेला कामाचा ताण लक्षात घेत आकृतिबंधामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सुरुवातीला महापालिकेच्या आकृतिबंधात एकूण ११ हजार ५१३ विविध पदांना मंजुरी मिळाली होती. मात्र, आकृतिबंधात सुधारणा करून पुन्हा पदसंख्या वाढविण्यात आली आहे. त्यानुसार आता तब्बल ५ हजार ३२५ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे जुना आकृतीबंध आणि सुधारीत असे मिळन तब्बल १६ हजार ८३८ पदांची निमिर्ती करण्यात आली आहे. या भरतीला शासनाने मंजुरी दिल्यानंतर महापालिकेकडून जम्बो नोकर भरती केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गात झाला आहे. तसेच, वाढती लोकसंख्या आणि कामकाजाचा वाढलेला ताण लक्षात घेता अधिक संख्येने अधिकारी व कर्मचारी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून सुधारित आकृतिबंध तयार आहे. त्यात विविध गटांतील एकूण १६ हजार ८३८ पदे आहेत. पूर्वीच्या आकृतिबंधाच्या तुलनेत ५ हजार ३२५ पदांची नव्याने निर्मिती केली आहे.